चंद्रपूरच्या विकासाचे व्हिजन असलेले विपीन पालिवाल…

15

चंद्रपूर प्राचिन शहर आहे. येथील ऐतिहासिक वास्तू त्याची आजही साक्ष देतात. नगरपालिका काळात चंद्रपूरच्या विकासासाठी अनेक योजना कार्यान्वित झाल्या. मात्र, मागील काही वर्षांत शहराचा विस्तार झपाट्याने झाला. बाबुपेठपासून राष्ट्रवादी नगरापर्यंत, एमईल श्यामनगरापासून दाताळा मार्गापर्यंत शहर वाढले. हजारोच्या संख्येचे हे शहर लाखोच्या घरात पोहचले आणि शहराने महानगराकडे झेप घेतली. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाची शहरातील नागरिकांना अत्यावश्यक सेवा पुरविताना दमछाक होत होती. अखेर, राज्य शासनाने चंद्रपूर नगरपालिकेला महानगरपालिकेचा दर्जा दिला. मनपाच्या स्थापनेपासून आतापर्यंत या शहराने अनेक कर्तबगार आयुक्त बघितले. मात्र, विपीन पालिवाल यांचा आयुक्तपदाचा कार्यकाळ येथील अबालवृद्धांच्या स्मरणीय असाच आहे. शासकीय योजनांची अंमलबजावणी करणे, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कनिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश देणे, एवढ्यातच धन्यता मानणारे अनेक अधिकारी आजही अनेक शासकीय कार्यालयात निदर्शनास येतात. परंतु, आय लव चंद्रपूर म्हणणारे पालिवाल हे एकमेव आयुक्त आहेत. आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पालिवाल यांनी या शहराच्या विकासाचे बघितलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी दिवस-रात्र एक केल्याचे शहरवासींनी अनुभवले आहे. नागरिकांना सुविधा व्हावी आणि दुसरीकडे लोकप्रतिनिधींचेही समाधान व्हावे या दोन्ही गोष्टींची, सांगळ घालण्यात खऱ्या अर्थाने पालिवाल यशस्वी झालेत. नागरिकांना सुविधा पुरविण्यासाठी कधी काळी अडगळीत पडलेली सहायक आयुक्तांची कार्यालये त्यांनी कार्यान्वित केली. याच कार्यालयातून सेवा मिळत असल्याने कधी काळी शेकडोच्या संख्येने थेट महापालिकेत आपली गाऱ्हाणी घेऊन येणाऱ्यांची संख्या आता बोटावर मोजण्याएवढी आली आहे. ही सर्व किमया केवळ आणि केवळ आयुक्त विपिन पालिवाल यांच्यामुळे शक्य झाली, हे कुणीही नाकारू शकत नाही.

bottom