नियोजनबद्ध पद्धतीने यात्रेची अंतिम तयारी पूर्ण करा – आ. किशोर जोरगेवार

6

चंद्रपूर:३ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चैत्र नवरात्रातील यात्रेसाठी चंद्रपूरात येणाऱ्या यात्रेकरूंना आवश्यक सुविधा मिळाव्यात, यासाठी युद्धस्तरावर काम करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यात्रा काही दिवसांवर आली असताना, परिसरातील तयारीची पाहणी करताना त्यांनी विविध विकासकामांचा आढावा घेतला आहे. हे काम नियोजनबद्ध पद्धतीने करून यात्रेची तयारी पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
यावेळी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, शहर अभियंता विजय बोरिकर, उपशहर अभियंता रवींद्र हजारे, सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी, अभियंता रविंद्र कळंबे, शाखा अभियंता आशिष भारती, शहर स्वच्छता अधिकारी डॉ. अमोल शेडके, स्वच्छता निरीक्षक भूपेश गोटे यांच्यासह श्री महाकाली माता महोत्सव ट्रस्टचे सचिव अजय जयस्वाल, सुनील महाकाले, बलराम डोडाणी, संजय बुरघाटे, तुषार सोम, भारतीय जनता पार्टीचे माजी महानगर अध्यक्ष दशरथ सिंग ठाकूर, रघुवीर अहिर, माजी नगरसेवक प्रदिप किरमे, राम जंगम, पराग मेलोडे आदिंची उपस्थिती होती.
यात्रेच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात भाविक, पर्यटक आणि व्यापारी वर्ग चंद्रपूर येथे येतात. त्यामुळे सुव्यवस्थित पाणीपुरवठा, वीज, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था आणि वैद्यकीय सेवा सुरळीत राहाव्यात, यावर आमदार किशोर जोरगेवार यांनी भर दिला. यात्रेकरूंना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागू नये, यासाठी स्थानिक प्रशासन आणि संबंधित विभागांनी पूर्वनियोजन करावे, असे निर्देश यावेळी आमदार जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी यात्रा परिसर, मंदीर परिसर, वाहन पार्किंग व्यवस्था, नव्याने सुरु करण्यात आलेले पर्यायी मार्ग आणि इतर भागांची पाहणी केली.
यात्रा परिसराची पाहणी करताना मुख्य रस्ते, पर्यायी मार्ग, मंडप, स्वच्छतागृहे, पार्किंग व्यवस्था आणि पाण्याच्या व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. यात्रेच्या कालावधीत पुरेसा पिण्याच्या पाण्याचा साठा असावा आणि परिसराची स्वच्छता राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता वाहतुकीचे नियोजन करण्यात यावे. पार्किंगच्या ठिकाणी शिस्तबद्धता असावी. गर्दीच्या ठिकाणी वैद्यकीय पथके तैनात ठेवावीत, आपत्कालीन परिस्थितीसाठी अधिकच्या रुग्णवाहिका सज्ज ठेवाव्यात. मंडप, मंदिर परिसर आणि प्रमुख रस्त्यांवर निर्बाध वीजपुरवठा राहावा, यासाठी दक्षता घेण्यात यावी यात्रा काळात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही नियंत्रण, स्वयंसेवकांची नेमणूक यासारख्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्यात.
यात्रेच्या काळात भाविकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, सर्व सोयी-सुविधा वेळेत आणि सुरळीत मिळाव्यात, यासाठी प्रशासनाने अधिक तत्परतेने काम करावे. यात्रेकरूंना कोणतीही अडचण होणार नाही, याची काळजी घ्यावी. यात्रा हा श्रद्धेचा आणि भक्तीचा महोत्सव आहे. तो आनंददायी आणि सुरक्षित व्हावा, हीच आमची जबाबदारी आहे.
हजारो भाविक भक्तिभावाने या पवित्र स्थळी येणार आहेत. त्यांच्या सुरक्षिततेची, सुविधांची आणि सोयींची जबाबदारी आपल्यावर आहे. त्यामुळे ही यात्रा निर्विघ्न पार पडावी, यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन समर्पित भावनेने कार्य करणे गरजेचे आहे. प्रशासन, स्थानिक स्वयंसेवक, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी एकत्र येऊन या यात्रेचे उत्कृष्ट नियोजन करावे. यात्रा सुरळीत पार पडेल आणि भाविकांना उत्तम सुविधा मिळतील, यासाठी आपण सर्वांनी जबाबदारीने कार्य करावे, अशा सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी केल्या आहेत.

bottom