चारचाकी वाहनाने वाळूतस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सहायक पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचे पथक छापा टाकण्यासाठी रवाना झाले. पोलिस येत असल्याची टीप वाळूतस्करांना मिळाली. त्यानंतर घटनास्थळावरून वाळूतस्करांनी पळ काढला. पोलिसांनीही तस्करांना माहिती होऊ नये म्हणून खासगी वाहनाने पाठलाग करणे सुरू केले. अखेर, वाळूतस्करांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. यावेळी पोलिसांनी १४ लाख १० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांकडून सातत्याने होत असलेल्या कारवाईने वाळूतस्करांचे धाबे दणाणले आहे.
सहायक पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांनी उपविभागीय पोलिस अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर वरोरा परिसरातील घाटांवरून वाळूतस्करी करणाऱ्यांवर कारवाईचा सपाटा लावला आहे. १४ मे रोजी पांढऱ्या रंगाचा एमएच ४० वाय १६९१ क्रमांकाच्या टिपरने आशीर्वाद ले-आऊट वरोराकडे वाळूची अवैधरित्या तस्करी करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाला आशीर्वाद ले-आऊट जवळील हनुमान मंदिराजवळ वाळूतस्करी करणारा टिपर आढळून आला. पोलिस येत असल्याचे बघून वाळूतस्करांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी खासगी वाहनाने पाठलाग करून वाळूतस्करांना बेड्या ठोकल्या.
पोलिसांनी चारचाकी वाहन व अन्य साहित्य असा १४ लाख १० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. टीपर चालक मिथुन यशवंत मडावी (वय ४२, रा. सालोरी), टीपर मालक राजेंद्र घनश्याम गोवारदिपे (वय ३९, रा. बोर्डा) या दोघांविरुद्ध भांदवि ३७९, ३४, सहकलम ४८ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सहायक पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक अमोल काचोरे, सहायक पोलिस निरीक्षक विनोद जांभळे, पोलिस शिपाई मोहनलाल निषाद, संदीप मुळे, महेश गावतुरे, विशाल राजूरकर यांच्या पथकाने केली.