जिल्ह्यातील चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, कोरपना या तालुक्यांत मोठ्या प्रमाणांत उद्योग आहेत. या उद्योगांतील कच्चा-पक्का मालाची वाहतूक करण्यासाठी या मार्गावर जडवाहने दिवस-रात्र धावत असतात. अनेक चालक रस्त्याच्या कडेला ट्रक उभी करीत असल्याने अपघाताच्या घटनांत वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी कोरपना तालुक्यात उभ्या ट्रकला धडक बसून तरुणांचा मृत्यू झाला होता. बल्लारपूर शहरातही अशीच स्थिती आहे. मात्र, याकडे येथील पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. मोठया ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांशी बल्लारपूर पोलिस ठाण्यातील काही पोलिस कर्मचाऱ्यांचे अर्थपूर्ण संबंध आहेत. गणेश पुरटकर, गजानन झाडे हे कर्मचारी ही मैत्री मागील काही दिवसांपासून चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत. त्यामुळे ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांच्या वाहनांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून रस्त्याच्या कडेला पार्किंग करण्यात येत असलेल्या ट्रकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.












