चंद्रपूर शहरालगत असलेल्या शिवनी चोर रेती घाटावर सध्या रेती तस्करांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, या संपूर्ण प्रकाराकडे महसूल व पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. परिणामी शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसुली तोटा सहन करावा लागत आहे.उन्हाळ्याच्या हंगामात बांधकामांची संख्या वाढत असल्याने रेतीची मागणी मोठ्या प्रमाणात असते. अनेक रेती घाटांवर बंदी असतानाही अवैध उपसा सुरूच असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः शिवनी येथील रेती घाटावर चंद्रपूर महसूल प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी कडक कारवाई केल्यानंतर तस्करांनी नीती चोरी थांबवली होती मात्र पुन्हा एकदा या रेती चोरांनी आपले डोके वर केले आहे घाट हा सध्या रेती तस्करीचा नवा अड्डा बनल्याचे चित्र आहे.
या अवैध तस्करीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर ट्रक आणि डंपरची वर्दळ वाढली आहे. परिणामी रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाणही वाढले असून स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. धुळीचे प्रदूषण, वाहतूक कोंडी आणि जीवितास धोका अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर घाटावरील अवैध रेती तस्करी तात्काळ थांबवून संबंधित तस्करांवर कठोर कारवाई करावी, तसेच महसूल व पोलीस प्रशासनाने आपली जबाबदारी पार पाडावी, अशी ठाम मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.












