चंद्रपूर शहरातील रहमतनगर परिसरात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत (रेशन) मिळणाऱ्या सरकारी धान्याचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. शासनाकडून गरीब आणि गरजू नागरिकांना मोफत अथवा अनुदानित दरात धान्य उपलब्ध करून दिले जाते. मात्र, काही धान्य तस्कर लाभार्थींना आमिष दाखवून त्यांच्याकडील धान्य खरेदी करतात आणि त्याची खुल्या बाजारात विक्री करून आर्थिक फायदा मिळवत असल्याचा आरोप आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रहमतनगर परिसरात हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असून याबाबत वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या प्रकरणात पुरवठा विभागातील काही कर्मचाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
नागरिकांनी या संदर्भात पुरवठा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र, कारवाई करण्याऐवजी संबंधित धान्य तस्कराला तक्रारीची माहिती देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. “तुझ्याविरोधात तक्रार आली आहे, सांभाळून घे, अन्यथा कारवाई होऊ शकते,” असा इशारा देण्यात आल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे.यामुळे पुरवठा विभागातील काही कर्मचारी आणि धान्य तस्कर यांच्यात संगनमत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जर या आरोपांमध्ये तथ्य आढळले, तर गरीबांसाठी असलेले धान्य काळ्या बाजारात विकले जाण्याला सरकारी यंत्रणेतील काही घटकांचा पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट होऊ शकते.
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच, सरकारी धान्य गरजूंपर्यंत पोहोचावे आणि काळाबाजाराला आळा बसावा, यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.












