चंद्रपूर, जो एकेकाळी भाजपचा गड मानला जात होता, तिथे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाने भाजपवर मोठा प्रभाव टाकला आहे. या पराभवाच्या कारणांचा आढावा घेऊन भाजपने पुन्हा कार्यकर्त्यांना सक्रीय करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, आता चंद्रपूर शहरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थतेची चर्चा वाढत आहे.चंद्रपूरमहानगरात भाजप ग्रामीणचे जिल्हा महामंत्री मंगेश गुलवाडे यांच्या अति हस्तक्षेपामुळे चंद्रपूर शहरातील भाजप कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक अस्वस्थ झाले आहेत. गुलवाडे सध्या शहरातील कार्यक्रमांमध्ये अधिक ढवळाढवळ करत असल्याची चर्चा आहे, ज्यामुळे “गुलवाडे विरुद्ध चंद्रपूर शहर भाजप” असा आंतरिक संघर्ष दिसून येत आहे.नुकत्याच झालेल्या नवीन बस स्थानकाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात याचे उदाहरण पाहायला मिळाले. गुलवाडे यांनी या कार्यक्रमाचे नियोजनाची जबाबदारी मागून घेतली होती, परंतु शहरातील पदाधिकारी आणि माजी नगरसेवक यामध्ये सहभागी झाले नाहीत. त्यामुळे गुलवाडे यांच्या चंद्रपूर महानगरात अति हस्तक्षेपामुळे चंद्रपूर शहरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढल्याची चर्चा रंगली आहे, आणि हे भाजपसाठी चिंतेचे कारण बनले आहे.












