चंद्रपूरच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी टायगर सफारी प्रकल्पाला गती द्या – आ. किशोर जोरगेवार

14

चंद्रपूरच्या मूल रोडवरील वन अकादमीजवळील ५०० एकर क्षेत्रात प्रस्तावित असलेल्या टायगर सफारी प्रकल्पाला गती देण्याची मागणी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. यावर उत्तर देताना केंद्राकडे पाठपुरावा सुरू असून लवकरच या प्रकल्पाला मान्यता मिळणार असल्याचे उत्तर वनमंत्री गणेश नाईक यांनी सभागृहाला दिले.
चंद्रपूर टायगर सफारी आणि रेस्क्यू सेंटरसाठी आमदार किशोर जोरगेवार यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. त्यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा विषय मांडला होता. वनमंत्री नाईक यांनीही प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद देत निधी वितरण प्रक्रिया गतीमान करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर आमदार जोरगेवार यांनी नागपूर येथील गोरेवाडा प्राणी संग्रहालयाची पाहणी करून प्रकल्पाच्या आराखड्याची माहिती घेतली होती.
दिल्ली येथील केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या कार्यालयातही या संदर्भात बैठक पार पडली होती. या बैठकीला भारत सरकारचे सदस्य सचिव डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, महाराष्ट्र राज्य वन्यजीव प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी, तसेच एफडीसीएम गोरेवाडा प्राणी संग्रहालय लिमिटेड, नागपूरचे सीईओ चंद्रशेखर बाला उपस्थित होते.
चंद्रपूरच्या वन अकादमीजवळ उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी सुमारे ६०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एफडीसीएम गोरेवाडा झू लिमिटेड या संस्थेकडे प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या प्रकल्पात ऑस्ट्रेलियन, साऊथ अमेरिकन, साऊथ आफ्रिकन आणि इंडियन ट्रेल अशा विविध थीमवर आधारित प्राणीदर्शन झोन असतील. पर्यटकांना येथे कांगारू, जग्वार, माकडे, कॅपीबारा, विविध रंगीबेरंगी पक्षी तसेच देशी-विदेशी प्राणी पाहता येणार आहेत. याशिवाय ४४ हेक्टर क्षेत्रात वाहन सफारी, २० एकर क्षेत्रात चिल्ड्रन पार्क आणि पर्यटकांसाठी विविध सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.
दरम्यान, आज अधिवेशनात बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी पुन्हा हा विषय उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले. ते यावेळी म्हणाले की, चंद्रपूर हा वाघांचे संरक्षण करणारा जिल्हा आहे. हे आमच्यासाठी भूषणावह असले तरी त्याचे दुष्परिणामही आम्हाला भोगावे लागत आहेत. दरवर्षी सुमारे ५० लोकांचे बळी वाघ घेत आहेत. त्यामुळे या नरभक्षी वाघांच्या रेस्क्यूसाठी रेस्क्यू सेंटर आणि टायगर सफारी चंद्रपूरला मंजूर करण्यात आली आहे. प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने त्याला मान्यताही दिली आहे. त्यामुळे या प्रकल्पाला गती देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
यासोबतच वाघ आणि बिबट्यांना पकडण्यासाठी वापरण्यात येणारे पिंजरे जुन्या पद्धतीचे असून ते रिमोट ऑपरेटेड करण्यात यावेत, अशीही मागणी त्यांनी केली. यावर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी टायगर सफारीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला असल्याचे सांगितले व त्याचा पाठपुरावा सुरू असल्याचे स्पष्ट केले. लवकरच या प्रकल्पाला मान्यता मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच हिंसक प्राणी पकडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पिंजऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत ते रिमोट ऑपरेटेड करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

bottom