हडसती घाटावर रेती तस्करांचा धुमाकूळ; महसूल प्रशासनाची डोळेझाक, शासनाला कोट्यवधींचा फटका

2

चंद्रपूर शहरालगत असलेल्या हडसती रेती घाटावर सध्या रेती तस्करांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, या संपूर्ण प्रकाराकडे बल्लारपूर महसूल प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. परिणामी शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसुली तोटा सहन करावा लागत आहे.उन्हाळ्याच्या हंगामात बांधकामांची संख्या वाढत असल्याने रेतीची मागणी मोठ्या प्रमाणात असते. अनेक रेती घाटांवर बंदी असतानाही अवैध उपसा सुरूच असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः शिवनी येथील रेती घाटावर चंद्रपूर महसूल प्रशासनाने अलीकडेच कडक कारवाई केल्यानंतर काही तस्करांनी आपला मोर्चा हडसती घाटाकडे वळवला आहे. त्यामुळे हडसती घाट हा सध्या रेती तस्करीचा नवा अड्डा बनल्याचे चित्र आहे.
या अवैध तस्करीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर ट्रक आणि डंपरची वर्दळ वाढली आहे. परिणामी रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाणही वाढले असून स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. धुळीचे प्रदूषण, वाहतूक कोंडी आणि जीवितास धोका अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर हडसती घाटावरील अवैध रेती तस्करी तात्काळ थांबवून संबंधित तस्करांवर कठोर कारवाई करावी, तसेच महसूल प्रशासनाने आपली जबाबदारी पार पाडावी, अशी ठाम मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

bottom