चंद्रपूर जिल्ह्यातील काही रेती घाटांचा लिलाव पूर्ण झाला असला तरी अनेक घाटांचा लिलाव अद्यापही प्रलंबित आहे. या परिस्थितीचा फायदा घेत काही रेती तस्करांनी अवैधरित्या रेती उपसा करण्याचा धंदा पुन्हा सुरू केल्याचे समोर येत आहे.
विशेषतः चंद्रपूर तालुक्यातील पिंपरी परिसरातील काही रेती चोरांनी मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरच्या व हाफ टन वाहनाच्या माध्यमातून रेती तस्करी सुरू केली आहे येथीलच एका स्वघोषित नेत्यांनी काही वर्षापासून रेती चोरीचा धंदा सुरू केल्याची चर्चा आहे. रात्रीच्या सुमारास नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेती उपसा होत असून प्रशासनाच्या कारवाईला जणू काही आव्हान दिले जात असल्याचे चित्र आहे.स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पिंपरी परिसरातील एक कुख्यात रेती तस्कर मागील अनेक वर्षांपासून या अवैध धंद्यात सक्रिय आहे. दरम्यानच्या काळात त्याने राजकारणात प्रवेश करून स्वतःची ‘व्हाईट कॉलर’ प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला. काही समित्यांमध्ये सदस्य म्हणूनही तो काम करत आहे मात्र, या पदांमागे लपलेला रेती चोरीचा धंदा मात्र अजूनही सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर पिंपरीतील ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडे संताप व्यक्त करत संबंधित रेती तस्करांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जिल्हाधिकारी तसेच तहसील प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत अवैध रेती उपसा थांबवावा आणि दोषींना अटक करून कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.












