खारोडे व खताड यांना जामीन मात्र एसपी पाटील फरार , वसुली अभियान सुरुच मासिक हप्तामध्येही वाढ

69

खारोडे व खताड यांना जामीन मात्र एसपी पाटील फरार , वसुली अभियान सुरुच मासिक हप्तामध्येही वाढ

बियर शॉपीसाठी एक लाखाची लाच स्वीकारणारे दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे व कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी जामिन मंजूर केला आहे. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांचा अटकपूर्व जामिन नाकारण्यात आला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ७ मे रोजी सापळा रचून खारोडे व खताळ या दोघांना एक लाखाची लाच स्वीकारतांना अटक केली होती. तर उत्पादन शुल्क अधीक्षक संजय पाटील सुटीवर होते. मात्र त्यांनी भ्रमणध्वनीवर दिलेल्या निर्देशानुसार त्यांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला होता. दरम्यान खारोडे व खताळ या दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता १० मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली होती. त्यानंतर १० मे रोजी दोघांनाही जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. आज सोमवारला या दोघांच्या अर्जावर जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली असता दोघांना जामिन मंजूर करण्यात आला. प्रत्येकी एक लाख रूपयाचे जातमुचलक्यावर ही जमानत मिळाली आहे. दरम्यान उत्पादन शुल्क अधीक्षक संजय पाटील यांचा अटकपूर्व जामिन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या चंद्रपूर कार्यालयातील अधिक्षक, दुय्यम निरीक्षक, कार्यालयीन अधिक्षक लाच प्रकरणात अडकले. मात्र कार्यालयातील निरीक्षकांनी दारु दुकानांदारांकडून मासिक हप्ता वसूली थांबवली नाही. उलट लाच प्रकरणाच्या आधी मासिक हप्तामध्ये वाढ करण्याच्या सूचना दारुविक्रेत्यांना दिल्या होत्या. त्या सूचनेची अंमलबजाणवी आता केली जात आहे. जिल्ह्यातील सातशे बार अॅन्ड रेस्टारंट आहेत. त्यांच्याकडून प्रतिमाह १५ हजार रुपये. पंधरा वाईन शॅाप आहेत. त्यांच्याकडून प्रत्येकी ३० हजार रुपये. १४० देशी दारु प्रत्येकी १८ हजार रुपये आणि १५० बियर शॅापी मालकांकडून प्रतिमाह दोन हजार रुपयेवसूली केली जाते. चंद्रपूर, राजुरा आणि वरोरा कार्यालयामार्फत एक ते दहा तारखेच्या आत मासिक हप्ता वसूली केली जाते. त्यानंतर ही रक्कम एकत्र करुन त्यांचे वाटप होते. दरम्यान या लाच प्रकरणाच्या दहा दिवस आधी. दारु दुकानांकडून घेतल्या जाणाऱ्या विद्यमान मासिक हप्त्यांमध्ये प्रत्येकी हजार ते दोन दजार रूपये वाढ करण्याच्या सुचना दिल्या होत्या. आता त्यांची प्रत्यक्ष अमलबजावणी केली जात आहे. वरिष्ठ अधिकारी लाच प्रकरणात अडकले असतानाही या विभागातील दुय्यम निरीक्षकांची वसूलीची हिंमत कमी झालेली नाही. त्यांचे पंटर वसूलीसाठी दारु विक्रेत्यांकडे चकरा मारत आहे. या कार्यालयामागे नेमके कुणाचे पाठबळ आहे, असा प्रश्न आता दारु विक्रेत्यांना पडला आहे.

bottom