बल्लारपुरानंतर चंद्रपुरातील व्यावसायीक धास्तावले चाकूचा धाक दाखवून व्यावसायिकाला लुटले

47

दुकान बंद करून घराकडे जात असलेल्या व्यावसायिकाला दुचाकीने आलेल्या युवकांनी थांबविले. चाकूचा धाक दाखवून त्याच्याजवळील ८० हजार रुपये लुटले. यानंतर व्यावसायिकाचीच दुचाकी घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. ही घटना काल सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास शहरातील सिंधी कॉलनी परिसरात घडली. दोन दिवसांपूर्वी बल्लारपुरातील कपडा दुकानावर बॉम्ब हल्ला करण्याची घटना ताजी असतानाच चंद्रपुरात घडलेल्या या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात सातत्याने घटणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना रोखण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
शहरातील सिंधी कॉलनी निवासी वासुदेव हरनामदास जाधवानी यांचे नागपूर मार्गावर ऑटोमोबाईल शॉप आहे. सोमवारी ते नेहमीप्रमाणे दुकानात गेले. दिवसभर साहित्य विक्रीतून प्राप्त झालेली सुमारे ८० हजारांची रकम घेऊन जाधवानी रात्री दुचाकीने घराकडे निघाले. जाधवानी यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. सिंधी कॉलनी परिसरात जाधवानी यांना लुटारूंनी थांबविले. चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडून रकम लुटण्याचा प्रयत्न केला. परंतु, जाधवानी यांनी पैसे न दिल्याने लुटारूंनी थेट त्यांचे दुचाकी वाहन घेऊन पळ काढला. या घटनेची तक्रार रामनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून लुटारूंचा शोध सुरू केला आहे.

bottom