एकीकडे रस्ते मोकळे करण्यासाठी अतिक्रमणविरोधी मोहीम, तर दुसरीकडे रस्ता बंद करून मोबाईल दुकानाचं उद्घाटन! नागरीकांमध्ये संतापाची लाट

62

चंद्रपूर शहरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या भीषण अपघातात एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर वाहतूक पोलिस आणि महानगरपालिकेने रस्ते मोकळे करण्यासाठी विशेष अतिक्रमणविरोधी मोहीम राबवण्यास सुरुवात केली. रस्त्यावर व फूटपाथवर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करत त्यांची दुकाने हटवण्यात आली. नागरिकांनी या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद दिला.
मात्र, याच दरम्यान शहरात एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. कस्तुरबा मार्गावरील श्रीकृष्ण टॉकीज चौकात एका मोबाईल दुकानाच्या उद्घाटनासाठी संपूर्ण रस्ताच बंद करण्यात आला. हा रस्ता गोल बाजार आणि मुख्य मेन रोडला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. उद्घाटनप्रसंगी मोठा पंडाल टाकण्यात आला, डीजे लावण्यात आला आणि भल्यामोठ्या एलईडी स्क्रीन्स लावून चार ते पाच तास संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली.
या दोन महत्त्वाच्या रस्त्यांवर दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. मात्र, उद्घाटन कार्यक्रमासाठी सार्वजनिक रस्ता बंद केल्याने वाहनचालक आणि नागरिकांनी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. काही भागात वाहतूक कोंडीही निर्माण झाली.
नागरिकांमध्ये यामुळे तीव्र नाराजीचा सुर उमटला आहे. “साध्या पथदिव्याखाली भाजी विकणाऱ्यांवर कारवाई केली जाते, पण मोठ्या व्यापाऱ्यांसाठी कायदा वेगळा का?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. प्रशासनाची ही दुहेरी भूमिका आणि निवडक अंमलबजावणीबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाकडून स्पष्टीकरणाची अपेक्षा या प्रकरणात वाहतूक विभाग व महानगरपालिकेने कोणती परवानगी दिली होती का? आणि सार्वजनिक रस्ता बंद करून मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेण्याची परवानगी मिळाली होती का? याबाबत प्रशासनाकडून स्पष्टीकरणाची मागणी आता जोर धरू लागली आहे.

bottom