चंद्रपूर : आमदाराच्या पियेच्या पत्नीच्या उमेदवारी तयारीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी; एकोरी प्रभागात अस्वस्थता वाढली

29

चंद्रपूर शहरात महानगरपालिका निवडणुकीचे वारे जोर धरू लागले असून लवकरच आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. यामुळे विविध प्रभागांतील संभाव्य उमेदवारांनी निवडणूक तयारीला वेग दिला आहे. नागरिकांच्या समस्या जाणून घेणे, भेटीगाठी घेणे आणि संघटन बळकटीसाठी संभाव्य उमेदवारांकडून दौरे सुरू आहेत.
मात्र शहरातील एकोरी प्रभागात वेगळीच नाराजी उसळली आहे. भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून ही नाराजी आमदारांच्या पीए ललित कासट यांच्या पत्नी दीपा ललित कासट यांच्या निवडणूक तयारीमुळे वाढली आहे. प्रभाग महिला आरक्षणात गेल्याने अनेक कार्यकर्ते उमेदवारीची तयारी करत होते. मात्र, अचानकपणे दीपाताई कासट यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याने अनेक वर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांना धक्का बसल्याची भावना व्यक्त होत आहे.
कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, “आमदारांसाठी वर्षानुवर्षे काम करायचे, आणि स्थानिक निवडणुकीत मात्र पीए हे आपल्या नातेवाईकांना पुढे करत असतील, तर कार्यकर्त्यांनी कुठे जायचे?” या प्रश्नाने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली आहे. काही कार्यकर्त्यांनी तर वरिष्ठ नेत्यांकडे थेट जाब विचारण्यास सुरुवात केली असल्याची माहिती मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर एकोरी प्रभागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजपला अंतर्गत विरोधाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

bottom