चंद्रपूर -: भाजपच्या उमेदवार मुलाखती अचानक थांबल्या; नियोजनाअभावी सभागृह बदलण्याची वेळ

41

चंद्रपूर महानगरपालिकेसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पक्षतर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. शहरातील एन डी हॉटेल येथे या मुलाखती सुरू होत्या. भाजपकडून निरीक्षक म्हणून पाठवण्यात आलेले चैनसुख संचेती यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडत होती. यावेळी आमदार किशोर जोरगेवार तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते हंसराज अहिर उपस्थित होते.दरम्यान, मुलाखती सुरू असतानाच सायंकाळी पाच वाजल्यानंतर अचानक मुलाखती थांबवण्यात आल्या. उपस्थित इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांना पुढील मुलाखती बुरटकर सभागृह येथे घेतल्या जातील, अशी माहिती देण्यात आली. यामुळे एकच गोंधळ उडाला.विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या, ते सभागृह केवळ सायंकाळी पाच वाजेपर्यंतच आरक्षित करण्यात आले होते. वेळ संपल्यानंतर हॉटेल व्यवस्थापनाने सभागृह रिकामे करण्यास सांगितल्याने अचानक ठिकाण बदलण्याची वेळ पक्षावर आली. त्यानंतर सर्व इच्छुकांना बुरटकर सभागृहाकडे हलवण्यात आले.
या संपूर्ण प्रकारामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त करण्यात आला. “इतक्या महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी जर चंद्रपूरमध्ये भाजपला वेळेवर सभागृह मिळत नसेल, तर पुढील निवडणूक व्यवस्थापन कसे होणार?” असा सवाल कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.दरम्यान, हा प्रकार नियोजनाच्या अभावामुळे की पक्षांतर्गत गटबाजीमुळे घडून आला, असा प्रश्नही आता भाजप कार्यकर्त्यांमध्ये उपस्थित केला जात आहे. या घटनेमुळे पक्षाच्या नियोजन क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आगामी काळात याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

bottom