काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद उफाळला? वडेट्टीवारांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित खासदारांच्या सत्काराचा जंगी कार्यक्रम, पण प्रतिभा धानोरकरांची दांडी

55

विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील नवनिर्वाचित काँग्रेस खासदारांच्या सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, या कार्यक्रमाला चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दांडी मारली . त्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद उफाळला आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. सावली तालुक्यातील व्याहाड-खुर्द या गावी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने लोकसभा निवडणुकीनंतर चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि गडचिरोलीचे खासदार नामदेव किरसान यांच्यासह वडेट्टीवार एकाच मंचावर येण्याची प्रतीक्षा होती. लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यात तिकिटाच्या मुद्द्यावरून झालेला संघर्ष ताजा असताना या सत्कार कार्यक्रमाला राजकीय महत्व होते. मात्र केवळ खासदार. किरसान यांची वडेट्टीवार यांच्यासह हजेरी, खासदारो. प्रतिभा धानोरकर चंद्रपूर मुख्यालयी कार्यालयात आज हजर होत्या मात्र त्यानी वडेट्टीवार यांच्यासह एका मंचावर येणे टाळले.महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून देखील रस्सीखेच पाहायला मिळाली होती. शेवटी दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून विजय वडेट्टीवारांची कन्या शिवानी वडेट्टीवार देखील इच्छुक होत्या. तर, लेकीच्या उमेदवारीसाठी वडेट्टीवारांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. थेट दिल्ली वारी करून त्यांनी मुलीच्या उमेदवारीसाठी फिल्डिंग लावल्याची चर्चा होती. पण शेवटी उमेदवारी मिळवण्यात प्रतिभा धानोरकरांनी बाजी मारली आणि सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव करत विजयश्री खेचून आणली होती.

bottom