बल्लारपुरातील वस्ती विभाग गांधी चौकातील मालू कापड दुकानावर पेट्रोल बॉम्बचा मारा करण्यात आला. यात दुकानातील फुटलेली काच लागून कामगार जखमी झाला. मात्र, दिवसभर बॉम्ब हल्ल्यासोबत गोळीबार झाल्याची चर्चा रंगली होती. पोलिस तपासात हल्लेखोरांकडे बंदूक होती. परंतु, त्यांनी फायर केले नसल्याची बाब समोर आली आहे. तसेच तुटलेला काच लागल्याने कामगार जखमी झाल्याचा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे. दुचाकीने आलेल्या तीन हल्लेखोरांनी जुन्या वैमनस्यातून ही घटना घडवून आणल्याचे बोलले जात आहे.
शहरातील गांधी चौकात मोतीलाल प्रभुलाल मालू कापड दुकान आहे. रविवार सकाळच्या १० वाजताच्या सुमारास अभिषेक मालू यांनी नेहमीप्रमाणे दुकान उघडले. त्यानंतर नोकर कार्तीक साखरकर हा सफाई करत होता. यादरम्यान तीन हल्लेखोर दुचाकीने दुकानासमोर आले. हल्लेखोरांनी दुकानदारासमोर सुतली बांब आणि पेट्रोल बाम टाकला. यामुळे दुकानातील काच फुटून नोकराच्या पायाला लागली. त्यात तो किरकोळ जखमी झाला. वैद्यकीय तपासात ही बाब समोर आली आहे.
घटनेनंतर मालू कुटुंबीयांनी सूरज गुप्ता याच्यावर गंभीर आरोप केले. या सर्व घटनेचा मास्टर माईंड सूरज गुप्ता असल्याचे म्हटले आहे. व्यापाऱ्यांनी दिवसभर बंद पाडून घटनेचा निषेध नोंदवला. पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. विशेष म्हणजे, वर्षभरापूर्वी मालू यांच्या कापड दुकानाला भीषण आग लागली होती. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली. यात शेजारी तंबाखू व्यापारी सूरज गुप्ता यांच्यावर पोलिसांचा आणि कुटुंबीयांचा संशय होता. त्याला अटक करण्यापूर्वी तो पसार झाला. मागील वर्षभरापासून तो पोलिसांच्या हाती लागला नाही. अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी सूरज गुप्ता याने उच्च न्यायालयात याचिका केली. मात्र, न्यायालयाने याचिका फेटाळली. वर्ष झाले तरी संशयित आरोपीला अटक झाली नाही. या हल्ल्यामागे मुख्य सूत्रधार हा संशयित सूरज असल्याची चर्चा आहे.












