अवैध विक्रीचा अड्डा बनली ‘अमन बिअर शॉपी’ महिलांची छळ आणि नागरिकांची डोकेदुखी मात्र उत्पादन शुल्क विभागाचे डोळेझाक सुरूच!

38

चंद्रपूर शहरात अवैध दारू विक्रीचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असताना, आता वैध परवानाधारक विक्रेत्यांनी देखील या गोरखधंद्यात उडी घेतल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. विशेषतः शहरातील गोलबाजार परिसरातील ‘अमन बिअर शॉपी’ स्थानिक नागरिक व महिलांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. प्रशासनाने परवानगी दिली असले तरी, नियमानुसार बिअर शॉपीतून फक्त बंद बाटल्यांमधून दारू विक्री करण्याची मुभा असते. मात्र उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादाने येथे सर्रासपणे दुकानाच्या समोर आणि दुकानाच्या आतील भागातच बसून मद्यपींना खुलेआम दारू पाजली जात आहे. परिणामी, या मार्गावरून जाणाऱ्या महिलांवर मद्यपींकडून अश्लील टिप्पणी, छेडछाड यांसारख्या घटनाही घडत आहेत, ज्यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.या बेकायदेशीर प्रकाराबाबत अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या असूनही उत्पादन शुल्क विभागाकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. अशा कारभारामुळे चंद्रपूरमध्ये पूर्वीही अनेक अघटित प्रकार घडले असूनही विभागाचे अधिकारी फक्त ‘लक्ष्मी दर्शनात’ व्यस्त असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.नागरिकांचा आरोप आहे की, शहरात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडत असताना उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी केवळ मूक प्रेक्षकाची भूमिका घेत आहेत. त्यामुळेच आता या संपूर्ण प्रकाराबाबत आमदारांची भेट घेऊन, लेखी स्वरूपात तक्रार सादर करून, विषय विधानमंडळाच्या अधिवेशनात मांडण्याचा निर्णय काही जागरूक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतला आहे.

bottom