दारूला समाजात नेहमीच अपायकारक मानले गेले आहे. अनेक संसार उद्ध्वस्त झाले, जीव गेले, आरोग्यावर गंभीर परिणाम झाले आणि अपघातांचे प्रमाण वाढले, हे सगळं दारूमुळे. मात्र या गंभीर परिणामांपेक्षा स्वतःच्या फायद्याला प्राधान्य देणारे दारू विक्रेते आता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत – तेही नागरिकांसाठी नव्हे, तर फक्त स्वतःच्या फायद्यासाठी!
शासनाने अलीकडेच दारू परवाना शुल्क व एक्साईज दरात वाढ केली आहे. यामुळे मद्यप्रेमींवर आर्थिक भार पडणार असून काहींना दारूचे व्यसन कमी करावे लागेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ही गोष्ट जरी समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने सकारात्मक असली, तरी दारू विक्रेत्यांना ही वाढ डोकेदुखी वाटत आहे या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिक दारू विक्रेत्यांच्या मोर्च्यांवर टीका करत आहेत. विक्रेत्यांचा हा संघर्ष सामाजिक भल्यासाठी नसून केवळ स्वतःच्या नफ्यापुरता मर्यादित आहे, हे अधिक स्पष्ट होत चालले आहे.












