हायवे पोलिसांच्या वसुलीवरून नागरिकांत संताप — मनोजच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

24

चंद्रपूर औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात दररोज मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होत असते. कोळसा, सिमेंट आणि इतर औद्योगिक मालाची वाहतूक सतत सुरू असल्याने महामार्गांवर वाहतुकीचा ताण प्रचंड आहे. अशा परिस्थितीत अपघात टाळणे आणि वाहतूक शिस्त राखणे ही जबाबदारी हायवे पोलिसांची आहे. मात्र, हायवे पोलिसांतील मनोज नावाच्या कर्मचाऱ्यामुळे कर्तव्य विसरून वसुलीकडे लक्ष केंद्रीत केल्याची गंभीर तक्रार नागरिकांकडून पुढे आली आहे.स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, मनोज आणि त्यांचे सहकारी रस्त्यावर थांबून वाहनचालकांकडून दंडाच्या नावाखाली पैसे वसूल करतात. अपघात नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करण्याऐवजी हे पोलीस चालकांना अडवून त्रास देत असल्याची नाराजी नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.
काही ट्रकचालकांनी तर असा आरोप केला आहे की, मनोज महिन्याकाठी ठरावीक रकमेचे “मासिक पास” वाटप करतात. या पासच्या बदल्यात चालकांकडून रोख पैसे घेतले जातात आणि त्यांना महामार्गावर बेभान गाडी चालवण्याची अलिखित परवानगी दिली जाते.दरम्यान, जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत अनेक गंभीर अपघात घडले असून, त्यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र हायवे पोलिसांच्या या वर्तणुकीमुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

bottom