: काँग्रेस पक्ष हा तळागाळातील कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आजचे सत्ताधारी मतचोरीतून सत्तेवर आले आहेत. त्यांच्या विरोधात देशपातळीवर विरोधी पक्षनेते राहुल गांधी आंदोलन करत आहेत. आपण निराश होऊ नका. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिद्दीने व आत्मविश्वासाने लढा. ही निवडणूक कार्यकर्त्यांना बळ देणारी ठरणार आहे, असे प्रतिपादन प्रदेश काँग्रेसचे निरीक्षक उमाकांत अग्निहोत्री यांनी केले.
बल्लारपूर तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने गुरुवार, १६ ऑक्टोबर २०२५ रोजी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका) सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची आढावा सभा* पार पडली.सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष धोटे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून उमाकांत अग्निहोत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व जि.प. माजी अध्यक्ष संतोषसिंग रावत, प्रदेश काँग्रेस सचिव घनश्याम मुलचंदानी, काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या डॉ. रजनी हजारे, शहर काँग्रेस अध्यक्ष देवेंद्र आर्य, तालुका काँग्रेस अध्यक्ष गोविंदा उपरे, माजी अध्यक्ष अब्दुल करीम शेख व डॉ. अनिल वाढई यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी सुभाष धोटे म्हणाले, आपली लढाई ही विचारसरणीची आहे. काँग्रेस पक्ष मजबूत करणे हे प्रत्येक कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे. कार्यकर्त्यांच्या बळावरच आम्ही नेतेपद गाठू शकतो. आगामी निवडणुकीला आत्मविश्वासाने सामोरे जाऊन जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका जिंकूया. उमेदवारी मिळाली नाही म्हणून मतभेद निर्माण करू नका, एकत्र राहून संघटित प्रयत्नांतून यश मिळवूया.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक घनश्याम मुलचंदानी यांनी केले. संचालन देवेंद्र आर्य यांनी केले, तर आभार प्रदर्शन नरेश मुदंडा यांनी केले.
या सभेला शहर व ग्रामीण भागातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.












