चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी आज नामांकन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांची मोठी धावपळ पाहायला मिळाली. विशेषतः काँग्रेस पक्षात शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली होती. अखेर अर्ज स्वीकारण्याची मुदत संपण्यास अवघे दहा मिनिटे शिल्लक असताना थेट नामांकन अर्ज स्वीकारण्याच्या ठिकाणी उमेदवारांना एबी फॉर्म पोहोचवण्यात आले.
दरम्यान, महाकाली प्रभाग काँग्रेससाठी ‘हॉट प्रभाग’ म्हणून पाहिला जात असून येथे एक विद्यमान अध्यक्ष आणि दोन माजी शहराध्यक्ष निवडणूक रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसकडून खुल्या प्रवर्गातून रामू तिवारी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. रामू तिवारी यांनी मागील सहा वर्षे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. मात्र, दोन महिन्यांपूर्वी त्यांना या पदावरून हटवण्यात आले होते. मात्र मनपातील त्यांच्या दीर्घ अनुभव पाहता अनुभव पाहता त्यांना महानगरपालिकेची उमेदवारी देण्यात आली आहे.
रामू तिवारी यांना महानगरपालिका प्रशासनाचा मोठा अनुभव आहे. तर दुसरीकडे, विद्यमान अध्यक्ष संतोष लहामागे यांच्याविरोधात काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष नंदू नागरकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे महाकाली प्रभागात नंदू नागरकर विरुद्ध संतोष लहामगे यांच्यातील थेट लढतीकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.












