भाजप उमेदवार प्रज्वलंत कडू याची अपक्षांना साथ; महाकाली प्रभागात अस्वस्थतेचे वातावरण

27

चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे भाजपमध्ये उमेदवारी व एबी फॉर्मच्या वाटपावरून अंतर्गत संघर्ष सुरू असतानाच, महाकाली प्रभागात भाजपचे उमेदवार प्रज्वलंत कडू यांच्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
महाकाली प्रभागातील भाजपचे उमेदवार प्रज्वलंत कडू यांनी आपल्या पक्षातील सहकारी उमेदवारांना बाजूला ठेवून थेट अपक्ष उमेदवारांची साथ धरल्याचे चित्र समोर आले आहे. ‘निष्ठावंत पॅनल’ या नावाने काही अपक्ष उमेदवारांनी तयार केलेल्या पॅनलमध्ये प्रज्वलंत कडू हेही सामील असल्याचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले असून, त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.विशेष म्हणजे, सुरुवातीला प्रज्वलंत कडू यांना भाजपची उमेदवारी मिळणार नसल्याचे संकेत होते. मात्र, ऐनवेळी झालेल्या राजकीय घडामोडींनंतर त्यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. तरीदेखील त्यांनी आधी आखलेली रणनीती आणि पक्षातील इतर उमेदवारांवरील अविश्वासामुळे ते अद्यापही अपक्ष उमेदवारांसोबत प्रचार करत असल्याची चर्चा आहे.
प्रज्वलंत कडू यांनी मागील निवडणुकीतही भाजपकडून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सर्वेक्षणात त्यांचे कार्य पक्षाला रुचले नसल्याने त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. यंदाही सुरुवातीला अशीच परिस्थिती होती; परंतु अखेरच्या क्षणी त्यांनी भाजपची उमेदवारी मिळवली. तरीही त्यांनी अपक्ष उमेदवारांची पकडलेली साथ त्यांच्या पक्षातीलच काही कार्यकर्त्यांचे पटलेली नाही त्यामुळे त्यांच्या पक्षांतर्गत विरोध वाढत असल्याचे भारतीय जनता पक्षातील सूत्रांनी सांगितले
या घडामोडींमुळे महाकाली प्रभागातील भाजप उमेदवारांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले असून, याचा थेट फायदा काँग्रेसचे मातब्बर व तगडे उमेदवार रामू तिवारी यांना होण्याची शक्यता प्रभागातील नागरिक व्यक्त करत आहेत. भाजपच्या अंतर्गत विसंवादाचा फटका पक्षाला कसा बसणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

bottom