चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता वेगाने रंगत असून सर्वच राजकीय पक्ष मैदानात उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षानेही अधिकृतपणे प्रचाराचा नारळ फोडला आहे. शहरातील महाकाली प्रभागातील तिवारी भवन येथे काँग्रेसच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ खासदार प्रतिभा धानोरकर आमदार सुधाकर अडबाले माजी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी काँग्रेसचे उमेदवार रितेश उर्फ रामू तिवारी, संतोष लहामगे, संगीता अमृतकर, करुणा चालखुरे यांच्यासह महाकाली प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानंतर काँग्रेसच्या उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधत निवडणूक प्रचाराला सुरुवात केली.
महाकाली प्रभागात रितेश उर्फ रामू तिवारी यांनी यापूर्वी नेतृत्वाची भूमिका बजावली असून त्यांच्या कार्यकाळात प्रभागात विविध विकासकामे करण्यात आली आहेत. या कामांच्या जोरावर त्यांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.












