चंद्रपूर शहर महानगरपालिकेत भाजपची सत्ता स्थापन झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच पक्षांतर्गत मतभेद उघडकीस येऊ लागले आहेत. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मर्जीतील संगीता खांडेकर या महापौरपदी विराजमान झाल्या असल्या, तरी त्यांच्या निवडीनंतर मुनगंटीवार समर्थक कार्यकर्त्यांमध्ये दोन गटांमध्ये चढाओढ सुरू झाल्याचे चित्र आहे.
महापौर नेमकं कोणाचं ऐकतील आणि कोणासोबत राहतील, यावरून कार्यकर्त्यांमधीलच दोन गट एकमेकांवर कुरघोडी करत असल्याची चर्चा भाजपच्या अंतर्गत वर्तुळात सुरू आहे.
आज महापौर संगीता खांडेकर यांनी चंद्रपूर शहरातील गोल बाजार परिसरात विविध विकासकामे व नागरिकांच्या समस्यांची पाहणी केली. यावेळी भाजपचे माजी शहराध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, माजी नगरसेविका छबु वैरागडे आशा अबोजवार तसेच नम्रता ठेमसकर यांची उपस्थिती होती.
मात्र मुनगंटीवार यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जाणारे राहुल पावडे तसेच काही अन्य नगरसेवक यावेळी अनुपस्थित होते. यामुळे डॉ. मंगेश गुलवाडे आणि राहुल पावडे यांच्यात अंतर्गत मतभेद सुरू असल्याची चर्चा आता उघडपणे केली जात आहे.या पार्श्वभूमीवर, महापौर संगीता खांडेकर यांच्यासमोर येत्या काळात मोठे समन्वयाचे आव्हान उभे राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे. एकीकडे महापौर पदाची जबाबदारी, तर दुसरीकडे पक्षातील दोन गटांना सांभाळण्याची कसरत त्यांना करावी लागणार आहे.
विशेष म्हणजे, चंद्रपूर शहर महानगरपालिका सभागृहात विषय मंजूर करून घेण्यासाठी त्यांना आवश्यक संख्याबळ आणि राजकीय पाठबळ मिळेल का, तसेच कठीण प्रसंगी नेमके कोण त्यांच्या पाठीशी उभे राहतील, हा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे. सोबतच भाजपची सत्ता असली तरी अंतर्गत गटबाजीमुळे प्रशासन आणि निर्णयप्रक्रियेवर परिणाम होणार का, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.












