चंद्रपूर -: रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या १४ एजेंटला अटक चंद्रपूर, घुघुस, भद्रावती, माजरी येथे एकाच वेळी कारवाई

116

नागपूर विभागांतर्गत आरपीएफ चंद्रपूर आणि सीआयबी नागपूरच्या पथकाने रेल्वे आरक्षण आणि तिकीटांवर कारवाई करत एकाच दिवशी १४ दलालांना अटक करून कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.उन्हाळी सुट्ट्या व लग्नसराईमुळे रेल्वेत प्रवासी गर्दी सातत्याने वाढत आहे, त्याचा फायदा घेत एजंटांकडून रेल्वे आरक्षणाच्या ई-तिकिटांचा काळाबाजार केला जात आहे. तिकीट प्रवाशांना उपलब्ध न झाल्यास असे एजंट गरजू प्रवाशांकडून मनमानी कमिशन वसूल करतात. या संदर्भात माहिती मिळाल्यावर रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त मनोज कुमार,आरपीएफ नागपूर, यांनी आरपीएफ पोलीस स्टेशन चंद्रपूरचे निरीक्षक के. एन. राय, एन.पी. सिंग यांना अशा एजंटांची ओळख पटवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले. वरील सूचनांवरून आरपीएफ पोलीस स्टेशन चंद्रपूरच्या हद्दीत रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्या एजंटांवर लक्ष ठेवून पाळत ठेवण्यात आली. रेकी केल्यानंतर, अशा दलालांवर कारवाई करण्यासाठी आरपीएफ पोलीस स्टेशन चंद्रपूर, नागपूर आणि विभागीय मुख्यालय यांचे संयुक्त पथक तयार करण्यात आले. शनिवार २० एप्रिल रोजी या पथकाची पाच भागात विभागणी करण्यात आली आणि रेल्वे कायद्यांतर्गत विविध शहरांमध्ये एकाच वेळी छापे टाकण्यात आले. अचानक आणि व्यापक छाप्यामुळे एजंटांना सतर्क राहण्याची संधी मिळाली नाही. या छाप्यात चंद्रपूर शहरात ५, घुग्घुस ५, वणी २, भद्रावती १ आणि माजरी येथे १ अशा १४ एजंटला पकडण्यात आले आहेत. त्यांच्याकडून ६१ लाईव्ह तिकीट, किंमत १ लाख ३२ हजार ४७ रुपये, ३ लाख ७८ हजार ४३४ रुपये किमतीची एकूण २१० तिकिटे जप्त करण्यात आली आहे. ५ लाख १० हजार ४८१ रुपये किमतीची एकूण २७१ तिकिटे जप्त करण्यात आली असून सर्व १४ एजंटांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई मनोजकुमार वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त यांच्या निर्देशानुसार निरीक्षक के.एन.राय, एन.पी.सिंग, उपनिरीक्षक आर.के.यादव, हरवंश सिंग, प्रियांका सिंग, सचिन नागपुरे, एन.पी.वासनिक, आर.के.भारती, मुकेश राठोड, अश्विन पवार, यांनी केली. विपिन दातीर, सागर भगत, वासुदेव, सुमित, शिरीन, सागर लाखे, व्ही.एस.यादव, हरविंदर, विकास, महीलाल यांनी केली आहे.

bottom