चंद्रपूर: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गोडाऊनवर कारवाई करत दोन दिवसांपूर्वीच मोठ्या प्रमाणात सुगंधी तंबाखू जप्त केला. विशेष म्हणजे, या अवैध सुगंधित तंबाखूच्या गोडाऊनची माहिती बल्लारशा पोलिसांना नव्हती. त्यामुळे बल्लारपूर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे. डिझेल चोरी, सट्टा, अवैध रेती व कोळसा वाहतूक, क्रिकेट बेटिंग जुगार या सारखे अवैध धंदे परिसरात उघडपणे सुरू असून, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी या व्यवसायात वर्चस्व गाजवले आहे. पोलिसांकडून यावर कुठलाही अंकुश दिसत नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, काही पोलीस कर्मचारी व अधिकारी या गुन्हेगारी प्रवृत्तींशी थेट संबंधित असून महिन्याला सलामी स्वरूपात पैसे घेत शेखर व गजानन गुन्हेगारांना संरक्षण देतात व पोलीस कुठलीही कारवाही करण्याच्या तयारीत असताना गुन्हेगारांना पूर्वीच माहिती पुरवतात. त्यामुळे गुन्हेगारांचे मनोबल अधिकच वाढले आहे.
नवीन पोलीस निरीक्षकही याच पद्धतीने काम करत असल्याचा आरोप नागरिक करत असून, या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी तातडीने लक्ष घालून गुन्हेगारांना मदत करणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.












