शिवनी चोर परिसरात रेती तस्करीचा सुळसुळाट; काकडे यांच्या आशीर्वादाने तस्कर बेधडक नागरिक त्रस्त, अपघातांचा धोका वाढला; कडक कारवाईची मागणी

39

चंद्रपूर जिल्हा मुख्यालयालगत असलेल्या शिवनी चोर गावात मोठ्या प्रमाणावर अवैध रेती तस्करी सुरू असून, या तस्करीला स्थानिक महसूल कर्मचाऱ्यांचा आशीर्वाद लाभत असल्याचा आरोप होत आहे. यामध्ये विशेषतः काकडे यांचे नाव समोर येत असून, त्यांच्या अर्थसंबंधांमुळे कारवाईला अडथळा निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे.गेल्या अनेक दिवसांपासून शिवनी परिसरातून सर्रासपणे ट्रॅक्टरच्या व इतर वाहनांचा साहाय्याने रेतीची तस्करी केली जात आहे. या वाहनांमुळे गावात धुराचे साम्राज्य पसरले असून, अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे गावकरी व परिसरातील नागरिक प्रचंड वैतागले आहेत.
नागरिकांनी वारंवार तलाठी आणि महसूल अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली असतानाही याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. स्थानिकांनी आरोप केला आहे की, काकडे यांचे तस्करांशी मैत्रीपूर्ण संबंध असून त्यामुळे अधिकाऱ्यांची यंत्रणा निष्क्रिय ठरली आहे.
एकीकडे शासन अवैध रेती तस्करीवर कठोर कारवाईचे आदेश देत असताना, दुसरीकडे त्यांचेच कर्मचारी तस्करांना संरक्षण देत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे काकडे व त्यांच्या साथीदारांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी जोर धरत आहे

bottom