चंद्रपूरजवळ रेती तस्करीतून गॅंगवॉरचा धोका; कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची शक्यता

42

चंद्रपूर जिल्हा मुख्यालयालगत असलेल्या शिवणीचोर या परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उत्खनन सुरू असून, या अवैध व्यवसायातून तस्करांमध्ये गॅंगवॉर भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाने रेती तस्करी थांबविण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या असल्या तरी त्या सर्व उपाययोजनांना वाकुल्या दाखवत रेती तस्करांचा उच्छाद सुरू आहे.शासनाच्या कारवाईला धाब्यावर बसवत या तस्करांनी अवैध उत्खननाला चुरस लागली असून, या व्यवसायात वर्चस्वासाठी आता परस्परांवर हल्ले करण्याची स्थिती निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत महसूल व पोलीस प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी, ‘लक्ष्मी दर्शनाच्या’ मोहात अनेक अधिकाऱ्यांकडून या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.रात्रीच्या वेळेस या भागात बिनधास्तपणे रेतीची तस्करी केली जाते. त्यामुळे कधीही मोठा संघर्ष उफाळून येऊन गंभीर अनुचित घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. यामुळेच गावकरी व परिसरातील नागरिकांनी या सर्व प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी केली आहे.गेल्या काही दिवसांत तस्करांमध्ये वाद उफाळल्याची चिन्हे स्पष्ट दिसत असून, यामुळे चंद्रपूर शहरासह परिसरातील कायदा व सुव्यवस्थेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. प्रशासनाने वेळीच पावले उचलली नाहीत, तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

bottom