राज्यातील पावसाळी अधिवेशनात “ऑनलाइन रमी”, “ऑनलाइन गेम”, “जुगार” या विषयांवर विधानसभेत तीव्र चर्चा होत असतानाच, चंद्रपूरच्या अभय टॉकीज परिसरात एका नव्या स्वरूपाच्या जुगाराचे थैमान सुरू झाले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून, विद्यार्थी, युवक आणि सामान्य नागरिक यांचे आयुष्य उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.
विशेष म्हणजे हा नव्या जुगाराचा प्रकार आकर्षक पद्धतीने मांडला जात असल्याने अनेक तरुण याकडे आकर्षित होत आहेत. मोठ्या प्रमाणावर पैसे लावून चालणाऱ्या या जुगारामागे एका खास गटाचे फंडिंग असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. या गोरखधंद्याचा प्रमुख सूत्रधार ‘इमाम’ नावाचा व्यक्ती असल्याचे बोलले जात आहे.एकीकडे पोलीस विभागाकडून चंद्रपूर जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरोधात कारवाई सुरू असताना, दुसरीकडे चंद्रपुरातच पोलीस यंत्रणेला गुंगारा देत नव्या पद्धतीने जुगार सुरू असल्याचे हे गंभीर वास्तव समोर आले आहे.
स्थानिक नागरिकांनी या जुगार केंद्रावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. गृह विभागाने आणि स्थानिक प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत तत्काळ पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी आता जनतेतून होत आहे.












