चंद्रपूर शहरातील रामाळा तलाव ते तीन खिडकी परिसर हा मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. महाविद्यालये, रुग्णालये आणि इतर महत्त्वाच्या आस्थापना या मार्गालगत असल्याने कस्तुरबा मार्गावर वाहतूक कोंडी झाल्यास अनेक नागरिक पर्यायी मार्ग म्हणून याच रस्त्याचा वापर करतात.
मात्र अलीकडे या मार्गावर काही नागरिकांनी महानगरपालिका निवडणुकीत उभे असलेल्या एका उमेदवाराच्या माध्यमातून नियमबाह्य पद्धतीने ब्रेकर बसवून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे ब्रेकर बसवण्यासाठी प्रशासकीय परवानगी आवश्यक असून यासाठी त्रिसदस्यीय समितीमार्फत पाहणी व मंजुरीची प्रक्रिया राबवली जाते. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही ब्रेकर संदर्भात स्पष्ट मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत.
असे असतानाही कोणतीही प्रशासकीय प्रक्रिया न पार पाडता या मार्गावर मोठ्या आकाराचे दगडी ब्रेकर तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या दुचाकी, चारचाकी तसेच रुग्णवाहिका चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अचानक उंच ब्रेकरमुळे वाहनांचे नुकसान होत असून नागरिकांच्या कंबरदुखी व मानेच्या त्रासात वाढ होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.
या गंभीर प्रकाराकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी महापालिका आयुक्तांकडे तात्काळ लक्ष घालून हे सर्व नियमबाह्य ब्रेकर त्वरित हटवावेत, अशी मागणी केली आहे.












