निकालानंतर कोचिंग क्लासेसचा दिखावा सुरु; बेकायदेशीर क्लासेसवर प्रशासनाने कडक कारवाई करावी – नागरिकांची जोरदार मागणी

39

महाराष्ट्रात नुकताच दहावी व बारावीचा निकाल जाहीर झाला असून निकालानंतर चंद्रपूर शहरातील काही कोचिंग क्लासेसकडून जाहिरातबाजी व टॉपर्सच्या नावाने गाजावाजा सुरू झालेला आहे. ‘आमचे विद्यार्थी सर्वोत्कृष्ट यश मिळवतात’ असा डंका पिटणाऱ्या या क्लासेसमागे मात्र अनेक संशयास्पद गोष्टी लपलेल्या आहेत.मागील काही महिन्यांपूर्वी शासन व न्यायालयाने अशा कोचिंग क्लासेससाठी विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली होती. मात्र, या नियमांची पायमल्ली करत अनेक क्लासेस सर्रासपणे बेकायदेशीर पद्धतीने चालूच आहेत. हे क्लासेस विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता, त्यांना शैक्षणिक दडपणाखाली ठेवून, चुकीच्या मार्गाने यश दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.इतकेच नव्हे तर, काही ठिकाणी बेकायदेशीर महाविद्यालये सुरू करून त्या नावावर विद्यार्थ्यांना बनावट प्रमाणपत्रे व गुणपत्रिका देण्यात येत असल्याचेही निदर्शनास आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येत असून, त्यांच्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासावर याचा वाईट परिणाम होऊ शकतो.या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासन व शिक्षण विभागाने तात्काळ या सर्व क्लासेसची सखोल तपासणी करावी, तसेच नियमबाह्य क्लासेसना बंद करण्यासाठी कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
विद्यार्थ्यांचे भवितव्य वाचवायचे असेल, तर बेकायदेशीर शिक्षण धंद्यांना आळा घालणे आता अपरिहार्य झाले आहे.

bottom