चंद्रपुर: बिअर शॉपीच्या नवीन परवान्यासाठी राज्य उत्पादन शूल्क विभागाचे अधीक्षक, दुय्यम निरीक्षक आणि कार्यालय अधीक्षकांनी एक लाख रुपयांची लाच स्वीकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. ७) ही कारवाई केली. या कारवाईने चंद्रपुरात मोठी खळबळ उडाली आहे. अधीक्षक संजय जयसिंगराव पाटील (वय ५४), दुय्यम निरीक्षक चेतन माधवराव खारोडे (वय ३४), कार्यालय अधीक्षक अभय बबनराव खताळ (वय ५३) अशी लाचखोर अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
तक्रारदार हे घुग्घुस येथील रहिवासी आहेत. त्यांचे घुगुस येथे गोदावरी बाई रेस्टॉरंट या नावाने बार आहे. त्यांना बिअर शॉपीचा नवीन परवाना काढायचा होता. त्यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग चंद्रपूर येथे परवाना मिळण्याकरिता अर्ज सादर केलेला होता. त्यानंतर अधीक्षक संजय जयसिंगराव पाटील, दुय्यम निरीक्षक चेतन माधवराव खारोडे यांनी परवाना देण्यासाठी टाळाटाळ केली. यानंतर दुय्यम निरीक्षक खारोडे यांनी बिअर शॉपीचे परवाना मंजूर करून देण्याचे कामाकरिता एक लाख ३० हजार रुपयाची मागणी केली. परंतु, तक्रारदाराची लाच देण्याची मुळीच इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाकडे २५ एप्रिल रोजी तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून पडताळणीची कार्यवाही करण्यात आली. त्यानुसार आज सापळा टाकण्यात आला. दुय्यम निरीक्षक चेतन माधवराव खारोडे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालय चंद्रपूर येथे कार्यालय अधीक्षक अभय बबनराव खताळ यांच्यामार्फतीने तडजोडीनुसार एक लाख रुपयांची लाच स्वीकारली. दुय्यम निरीक्षक चेतन माधवराव खारोडे आणि अधीक्षक संजय जयसिंगराव पाटील यांच्या फोनवरून पडताळणी केली असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट झाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दुय्यम निरीक्षक चेतन माधवराव खारोडे, कार्यालय अधीक्षक अभय बबनराव खताळ या दोघांना ताब्यात घेतले आहे. वृत्तलिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार नरेश नन्नावरे, हिवराज नेवारे, संदेश वाघमारे, राकेश जांभुळकर, पुष्पा काचोळे, सतीश सिडाम यांच्या पथकाने केली.












