चंद्रपूर शहरातील महाकाली प्रभागात काही अपक्ष उमेदवारांनी एकत्र येत ‘एकनिष्ठ पॅनल’ स्थापन केले होते. मात्र अवघ्या दोन दिवसांतच हे पॅनल पूर्णतः विस्कळीत झाले असून, पॅनलमधील उमेदवारांमध्ये परस्पर विश्वासाचा अभाव स्पष्टपणे समोर आला आहे.
या पॅनलमध्ये अ गटातून प्रज्ञा संदीप देव, ब गटातून अरुणा अजय वैरागडे, क गटातून प्रज्वलंत प्रमोद कडू आणि ड गटातून नंदू संभाजी नागरकर यांचा समावेश होता. महाकाली प्रभागातून एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा त्यांचा निर्धार होता. मात्र पॅनल स्थापन झाल्यानंतर भाजपकडून उमेदवारी मिळणार नाही या भीतीने या पक्षांच्या पॅनल मध्ये सामील झालेले प्रज्वलंत कडू यांनी वेळेवर भाजपकडून उमेदवारी स्वीकारली, तर अ गटातील प्रज्ञा देव यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
या घडामोडींमुळे पॅनलमधील उमेदवारांमध्ये सुरुवातीपासूनच एकमेकांवर विश्वास नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी पॅनल तयार होण्याआधीच ते फुटल्याचे चित्र निर्माण झाले असून, प्रभागातील नागरिकांमध्येही या उमेदवारांविषयी अविश्वासाची भावना बळावली आहे.
या पॅनलमध्ये सहभागी असलेले तसेच नंतर इतर पक्षांत गेलेले उमेदवार यांच्यासाठी ही निवडणूक अधिक आव्हानात्मक ठरणार असल्याची चर्चा महाकाली प्रभागात सुरू आहे. नागरिकांचा विश्वास डगमगल्याने निवडणुकीच्या रणधुमाळीत त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.












