गांजा तस्कराच्या मुसक्या आवळा – मुम्मका सुदर्शन
चंद्रपूर शहरात गांजा आणि अंमली पदार्थांची तस्करी वाढली असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेला तस्करांवर कारवाईचे आदेश दिले. शहरात अमली पदार्थाची तस्करी सुरु असतानाही कारवाई होत नव्हती. त्यामुळे शेवटी पोलिस अधिक्षकांनाच पुढाकार घेवून कारवाईचे निर्देश द्यावे लागले.चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी असताना गांजा आणि अमली पदार्थांचा सुळसुळाट झाला. महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणात याच्या आहारी गेले. पोलिसांनी तस्करांवर कारवाया सुद्धा केल्या. त्याउपरही तस्करी थांबली नाही. दारु पूर्ववत सुरु झाल्यानंतर सुद्धा गांजा आणि अंमली पदार्थाची तस्करी सुरुच आहे. शहरातील घुटकाळा, रहेमनगर, बिनबा गेट , बाबूपेट परिसरातून याची विक्री केल्या जाते. तस्करांचे तार आंतरराज्याशी जुळलेले आहे. युवक यांच्या आहारी जात असताना पोलिस यंत्रणा मात्र सुस्तावली होती. केवळ दुचाकी चोरांना पकडण्यासाठी पोलिस आहे का,असे चित्र निर्माण झाले होते. नवे पोलिस अधिक्षक आल्यानंतर परिस्थिती थोडीफार बदलली. मात्र तस्करांच्या मुसक्या आवळण्यात पोलिस यंत्रणा सुस्तावलेलीच राहीली. आता यासाठी अखेर पोलिस अधिक्षकांना पुढाकार घ्यावा लागला असून गांजा आणि अंमली पदार्थाचा तस्करांवर कारवाईचे निर्देश पोलिस अधिक्षकांनी दिले आहेत.












